तृप्ती देसाईंची लातूरमधील अतिवृष्टीग्रस्तांना मदत; ‘माझं लातूर’ परिवाराच्या आवाहनाला दिला प्रतिसाद
लातूर : शहरातील अतिवृष्टीमुळे प्रभावित कुटुंबांना सामाजिक संस्था आणि संघटनांनी मदत करावी, असे आवाहन ‘माझं लातूर’ परिवाराने केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी स्वतः लातूरात येऊन भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून आपदग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप करून प्रत्यक्ष मदत केली.भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून एक महिनाभर पुरेल इतक्या प्रमाणात धान्यकिट गरजू कुटुंबांतील महिलांना देण्यात आली. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या मदतीमुळे अनेक महिला भावुक झाल्या.
तृप्ती देसाई यांनी बुधोडा येथील माणूस प्रतिष्ठान संचलित ‘माझं घर’ या आश्रमालाही भेट देऊन तेथील बालकांचे उपक्रम, तसेच नुकसानीची माहिती घेतली. यापुढील काळात ‘माझं घर’ येथील बालकांना शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि आश्रमासाठी अन्नधान्याची मदतही केली. सरकारने पंचनामे केले असले तरी ठरल्याप्रमाणे मदत प्रत्येक आपदग्रस्त कुटुंबापर्यंत तातडीने पोहोचणे आवश्यक आहे, तरच त्यांच्या घरात दिवाळी साजरी होईल, अशी मागणी देसाई यांनी राज्यशासनाकडे केली. या प्रसंगी ‘माझं लातूर’ परिवाराचे प्रमुख सतीश तांदळे, डॉ. जुगलकिशोर तोष्णीवाल, उमेश कांबळे, संदीप पाटील, वेदप्रकाश भुसनुरे, अमोल शिंदे, माधव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर महामुनी, सलमान सय्यद, विकास साळुंके, जाकीर सय्यद यांच्यासह भूमाता ब्रिगेड व फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


0 Comments