लाटेवस्ती (महाळुंग) शाळेत शिक्षकांचा निरोप समारंभ
लाटेवस्ती (महाळुंग) : येथील शाळेतील शिक्षक दिलीप उकिरडे व श्रीमती रेहाना तांबोळी यांची बदली झाल्याने शाळेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक दिलीप मुळे, पुष्पा मुळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी संध्या नाचणे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अरुणा जाधव व माजी शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे उपस्थित होते.
दिलीप उकिरडे व श्रीमती रेहाना तांबोळी यांनी शाळेत कार्यरत असताना अध्यापन कार्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांनी शाळेची विद्यार्थीसंख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने वाढवली. शाळेत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण, महिलांचे मेळावे, आरोग्यविषयक जनजागृती तसेच विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या. शालाबाह्य विद्यार्थी राहणार नाही यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून शाळेला गुणवत्ताधारक शाळा म्हणून ओळख मिळवून दिली.
सामाजिक संस्थांकडून शाळेसाठी आर्थिक तसेच साहित्यिक मदत मिळवून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही त्यांनी यशस्वीपणे केले. त्यांच्या बदलीमुळे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला ग्रामशिक्षण समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांमध्ये सदाशिव शिंदे, मारुती लाटे, शामराव लाटे, राजाराम काळे, कुबेर रेडे पाटील, साहेबराव लाटे, राहुल यादव, मारुती काळे, दाऊद मुलाणी, सावंत काका, सौ. सविता गायकवाड, स्वाती लाटे, वनिता कुदळे आदींचा विशेष सहभाग होता.



0 Comments