भारताच्या नकाशावर देशभक्तीपर चित्रकृतीचे भव्य सादरीकरण
पुणे : {प्रतिनिधी/रोहिणी बनसोडे} मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संचलित कांतीलाल शाह विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर चित्रकृतीसह १२ विविध भाषांतील देशभक्तीपर घोषवाक्यांचे १२०० हुन अधिक फलक एकत्र करून भारताच्या नकाशा आकारातील भव्य कलाकृती तयार केली आहे. ही कलाकृती दि. १३ (सोमवार) सकाळी ९ वाजता सादर केली जाणार आहे, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका वैशाली शिंदे, व्यवस्थापिका अर्चना चव्हाण, पर्यवेक्षक सारिका तीतर, कला शिक्षक अमृता परदेशी आणि तेजश्री निमगिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभक्तीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये वाढविण्यासाठी १२०० विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज, स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या इतिहास पुरुषांची आणि विविध ऐतिहासिक वास्तूंची चित्रे रेखाटली आहेत. तसेच १२ भाषांतील देशभक्तीपर घोषवाक्यांचे फलक बनविले आहेत. या सर्व कलाकृतींमध्ये पर्यावरणाला हानी न पोहोचणारे रंग वापरले गेले आहेत. सर्व चित्रे ५० बाय ४० फूट आकाराच्या भारत नकाशाच्या आकारात एकत्र चिकटवण्यात आली आहेत.चित्रकार मिलिंद मुळीक, किशोरी जैन आणि अमोल पवार यांच्या हस्ते या भव्य कलाकृतीचे अनावरण होणार आहे. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष शैलेश शहा, संजय साने खजिनदार निरुपा कानिटकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
0 Comments