Latest News

6/recent/ticker-posts

पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धेचा समारोप; चार विभागांतील संघांचा सहभाग

पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धेचा समारोप; चार विभागांतील संघांचा सहभाग


लातूर : काळाच्या ओघात पोलिसांच्या कामाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व कणखर असणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजयजी भारुका यांनी व्यक्त केले. ते तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.

या स्पर्धेचे आयोजन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. समारोप व बक्षीस वितरण सोहळा शनिवारी (दि. ११) बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडला. या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग आणि निलंगा उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. आजच्या काळात पोलिसांवर इतर कोणत्याही विभागापेक्षा अधिक जबाबदारी असल्याने प्रत्येक युनिफॉर्मधारी अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही आणि जनतेप्रती एकनिष्ठ राहून आपले कर्तव्य पार पाडावे, असेही संजयजी भारुका यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, गोळाफेक, लांबउडी, भालाफेक, थाळीफेक, तायक्वांदो आदी विविध क्रीडा प्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत चाकूर, अहमदपूर, निलंगा उपविभाग व पोलीस मुख्यालय या चार विभागांचे संघ सहभागी झाले होते. त्यापैकी पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. उत्कृष्ट महिला व पुरुष खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. समारोप सोहळ्याला पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पारसनाथ (कमांडर, सी.आर.पी.एफ.), विशाल कोरे (असिस्टंट कमांडर, सी.आर.पी.एफ.), अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपाधीक्षक गृह मेत्रेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, रवींद्र चौधरी, गजानन भातलवंडे, साहेबराव नरवाडे, धुमे, रायबोले, कुमार चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधाकर बावकर तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शाखाप्रमुख, नागरिक आणि विविध वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, उपनिरीक्षक आयुब शेख, क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे, युसुफअली धावडे, प्रशांत स्वामी, रियाज सौदागर, सुहास जाधव, प्रशिक्षक रौफ सय्यद आणि दयानंद गिरी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments