लातूरला प्रथमच राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धांचे आयोजन
राज्यातील नऊ विभागांतील हजारावर खेळाडूंचा सहभाग; उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयात
लातूर : दि. 15 - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे दरवर्षी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुमारे 92 खेळांच्या स्पर्धा 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली या वयोगटांमध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर या क्रमाने पार पडतात. सन 2025-26 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांपैकी जलतरण या प्रकारातील राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद लातूर जिल्ह्याला मिळाले आहे. जलतरण स्पर्धा लातूरमध्ये प्रथमच होत आहेत, शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) आणि जिल्हा क्रीडा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन 16 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राजर्षी शाहू महाविद्यालय क्रीडा संकुल, हरंगुळ रेल्वे स्टेशनजवळ, बार्शी रोड, लातूर येथे करण्यात येणार आहे.
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि शिवछत्रपती क्रीडापीठ या नऊ विभागांमधून सुमारे 1000 खेळाडू, संघव्यवस्थापक आणि तांत्रिक अधिकारी या स्पर्धेत सहभागी होणार असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आकर्षकपणे सज्ज करण्यात आला असून, खेळाडूंसाठी निवासाची व्यवस्था महाविद्यालयाच्या तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहामध्ये करण्यात आली आहे. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, लातूर मा. वर्षा ठाकुर-घुगे (भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. शिव छत्रपती शिक्षण संस्था आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाचा संपूर्ण प्रशासन व क्रीडा विभाग या उपक्रमासाठी कार्यरत आहे.
या स्पर्धेत पुणे विभागातील आंतरराष्ट्रीय खेळाडू त्विशा दिक्षीत, काव्या रिसबुड, इशान तिडके, शाल्व मुळे, काईजा शंकर, सलोनी साळुंखे, वरद मारणे, आयुष पुंडे; कोल्हापूर विभागातील अथर्वराज पाटील; मुंबई विभागातील साईमिरा मेहरोत्रा तसेच शिवछत्रपती क्रीडापीठ विभागातील चैतन्य शिंदे आणि श्रीलेखा पारिख हे राष्ट्रीय पदकविजेते जलतरणपटू सहभागी होत आहेत. त्यामुळे लातूरमधील उदयोन्मुख खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचे कौशल्य जवळून पाहण्याची मौल्यवान संधी मिळणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता राजर्षी शाहू महाविद्यालय क्रीडा संकुलातील तलावावर होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख भूषवणार आहेत. संस्थेचे सचिव डॉ. अनिरुद्ध जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी व प्र. उपसंचालक (क्रीडा), लातूर विभाग महादेव कसगावडे हे प्रमुख उपस्थित राहतील. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील विविध विभागांमधून आलेल्या खेळाडूंचे लातूर शहरातील नागरिकांनी आत्मीय स्वागत करावे, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे आणि महादेव कसगावडे यांनी केले आहे.
0 Comments