ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून
बोधेगावचा बोध..इथे ओशाळला धर्म..
आज दिवसभर एक फोटो सोशल मीडियावर फिरतो आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव या गावात हिंदू मुलीच्या लग्नात बाबा पठाण या व्यक्तीने मामाची भूमिका निभावली आणि मुलीच्या पाठीमागे मामा म्हणून खंबीरपणे उभा राहिले. इतकचं नाही तर दरवर्षी बाबा पठाण त्या मुलींच्या आईकडून रक्षाबंधनाला राखी बांधून घेत असल्याचेही सांगण्यात आले.तसा फोटो आणि घटना खूप भावनिक आहे.पुरोगामी महाराष्ट्राला शोभेसी आहे आणि अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी पण आहे.मुळात ग्रामीण भागात अजूनही धर्मवेडाचे भूत इतके घुसले नाही,जितके शहरी भागात आहे.ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोघेही समसमान संख्येने राहतात त्या शहराने तर धर्माच्या नावावर आपली दुकानदारी सुरू करून राजकीय पोळ्या भाजण्याचा धंदाच उघडला आहे.हिंदूंनी गुलाल उधळला की मुस्लिमांनी हिरव्या रंगाच्या गोण्या रस्त्यावर खाली करून आनंदोत्सव साजरा करायचा.हिंदूंनी रस्त्यावर महाआरत्या करायच्या आणि मुस्लिमांनी नमाज अदा करायच्या..एकमेकांची स्पर्धा करण्याच्या नादात आम्ही इतका द्वेष पेरत सुटलो आहोत की,मित्राला मित्र भेटताना सुध्दा संकोच वाटावा..असे अनेक बाबा पठाण आजही खेड्यापाड्यात आहेत,ज्यांनी हिंदू धर्माचाच अभ्यास जास्त केलेला आहे.माझ्या लहानपणी गावात महाभारत,रामायण याचे वाचन आणि अर्थ माझ्या चांदपाशा नावाच्या मित्राचे वडील भिक्कमसाब सांगायचे.हिंदूचे सगळे सण त्यांच्या घरात साजरे व्हायचे.एकमेकात असलेला धार्मिक सलोखा आज राहिलेला नाही.राजकारण्यांनी एकमेकात इतका जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवला आहे की,निवडणुकीपूर्वी जातीच्या याद्या बनवल्या जातात.मग मुस्लिम समाजात फिरण्यासाठी धर्मगुरू आणि हिंदूसाठी महाराज मंडळी..जातिजातीची गणिते बांधून त्यातील नेत्यांना सुगीचे दिवस असतात.त्यांना तर प्रत्येक जातीतील मतदारांची यादी द्यावी लागते आणि त्यानंतर त्या प्रत्येक मतदाराचे पैसे..या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसातला माणूस संपून गेला.एकमेकांविषयी असलेली प्रेमाची भावना संपली.जातीचे आणि धर्माची दुकाने सुरू झाली.मग रंग वाटून घेतला,पक्ष वाटून घेतले आणि एकमेकांबद्दल असलेली प्रेमाची भावना संपुष्टात आली..बाबा पठाण या सगळ्यामध्ये एक आशेचा किरण आहेत. सख्ख्याला सख्खे न म्हणण्याच्या काळात बाबा पठाण यांनी एक आशावाद जिवंत ठेवला आहे.मामाच्या गळ्याला पडून रडण्याचे दिवस फार कमी ठिकाणी शिल्लक आहेत.अश्या काळात बाबा पठाण यांनी एक आदर्श समजासमोर घालून दिला आहे.भावना श्रेष्ठ की कर्तव्य श्रेष्ठ हा प्रश्न कायम विचारला जातो.जिथे भावना असतात तिथे माणूस कर्तव्याला कधीच चुकत नाही.आमच्यातील भावना संपत चालली आहे.आमच्या पिढीपर्यंत काहीअंशी माणूस माणसाला ओळखेल तरी,पुढे चालून भाऊ भावाशी एक नाही तिथे मामा,काका ही नाती राहतील की नाही असा प्रश्न आहे..
बाबा पठाण,अंगातल रक्त भगव की हिरव?इथपर्यंत आलेल्या लढाईत आपण एक दीपस्तंभ आहात.माणसात माणुसकीचा झरा जोपर्यंत आहे तोपर्यंत जातीपलीकडे माणूस जीव लावतो.प्राणी माणसापेक्षा हल्ली जीव लावताना दिसत आहेत.आपण या कुटुंबावर जो जीव लावला आणि त्यांच्यात आनंद निर्माण केला त्याबद्दल आपले आभार..माणुसकीचा धर्म आधार आहे.अंगावरून हात फिरवले तर कुत्रा,मांजर शेपूट हलवून घुटमळू लागतात.आपण तर एका कुटुंबाचा मामा झालात.त्या लेकरांच्या आयुष्यात आनंद पेरला आहात..माझा देश अश्या छोट्या छोट्या भिंतीनीच बांधला गेलाय.अशी काही माणसे आहेत म्हणून देश एकसंघ आहे.राजकारण्यांनो,नका विद्वेष पसरवू,आम्हाला एकसंघ राहू द्या,एका तिरंग्याखाली..जय हिंद
संजय जेवरीकर(ज्येष्ठ पत्रकार)
0 Comments