उस्मानाबादकरांना पुन्हा पाहावयास मिळणार धनुर्विद्येचा थरार
शालेय धनुर्विद्या स्पर्धा : १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार रंगतदार सामने
उस्मानाबाद: क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आर्चरी असोसिएशन ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्टच्या वतीने उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान १४ वर्षे वयोगातील राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उस्मानाबादकरांना पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून धनुर्विद्येचा थरार पाहावयास मिळणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी दिली.
गत वर्षी वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा थरार अनुभवलेल्या उस्मानाबादकरांना यंदा शालेय धनुर्विद्या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धनुर्धरांचे रोमांचीत धनुर्विद्या पाहावयास मिळणार आहे. लातूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, क्रीडा प्रबोधिनी अशा ९ विभागातून जिल्ह्यात ४०० खेळाडू, संघ मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच, पदाधिकारी, तांत्रिक समिती, स्कोरर, स्वयंसेवक यांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, कैलास लांडगे आदींसह जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे धनुर्धर, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी स्पर्धेस उपस्तीथी नोंदवत स्पर्धेस रंगात आणण्याचे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, भारतीय धनुर्विद्या महासंघाचे महासचिव प्रमोद चांदुरकर यांच्यासह लातूर विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.
0 Comments