Latest News

6/recent/ticker-posts

मोहोळच्या कराटेपटूंना राष्ट्रीय निवड चाचणीत यश

 मोहोळच्या कराटेपटूंना राष्ट्रीय निवड चाचणीत यश

नळेगाव येथे पार पडलेल्या अशिहरा कराटे व स्पोर्ट केम्पो राष्ट्रीय निवड चाचणीत तृतीय क्रमांकाची घवघवीत कामगिरी

नळेगाव : ता. चाकूर, जि. लातूर – स्पोर्ट केम्पो महाराष्ट्र असोसिएशन आणि अशिहरा कराटे असोसिएशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अशिहरा कराटे व स्पोर्ट केम्पो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा रविवार, २९ जून २०२५ रोजी नळेगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मोहोळ येथील कराटे संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मोहोळ संघामध्ये कबीर आदलिंगे, आदित्य फडतरे, सार्थक थीटे, रुद्र पवार, तन्वी गुरव, तेजस्विनी सुतार, उत्कर्षा आंडगे, योगिता आदलिंगे, प्रांजली गावडे, जान्हवी गुरव, तनिष्का फडतरे, किरण लवटे आणि संचित्ता महामुनी या खेळाडूंनी सहभाग घेतला. या सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत आपली छाप उमटवली.

संघाला सौ. सुजाता (माळी) आदलिंगे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण झाली, हे या यशाचे प्रमुख कारण ठरले. या यशाबद्दल दिनेश आदलिंगे, सौ महानंदा आंडगे ,प्रियंका गावडे, अनुजा सुतार, पार्वती लवटे, संभाजी आदलिंगे, सोमनाथ गुरव तसेच मित्रपरिवाराने खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच सूर्यकांत चव्हाण होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी (अध्यक्ष, अशिहरा कराटे इंडिया व स्पोर्ट केम्पो इंडिया) होते. आपल्या भाषणात त्यांनी कराटे या खेळाचे शारीरिक, मानसिक व आत्मरक्षणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व सांगितले. स्पोर्ट केम्पो महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव के. वाय. पटवेकर यांनी युवकांनी अशा खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन करत कराटे खेळामुळे आत्मविश्वास, शिस्त आणि धैर्य वाढीस लागते, असे मत व्यक्त केले. मोहोळच्या कराटेपटूंचे हे यश भविष्यातील आणखी मोठ्या संधींचे दार उघडणारे ठरेल, असा विश्वास प्रशिक्षक व पालक वर्गातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments