Latest News

6/recent/ticker-posts

डकार रॅली पूर्ण केलेला पहिला भारतीय संजय नववर्षात पुन्हा सज्ज

डकार रॅली पूर्ण केलेला पहिला भारतीय संजय नववर्षात पुन्हा सज्ज

पुणे :{ प्रतिनिधी/ राजकुमार भंडारी } सरत्या वर्षाच्या प्रारंभी डकार रॅली पूर्ण करून इतिहास घडविणारा पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय नववर्षात हे आव्हान कारकिर्दीत दुसऱ्यांदा स्विकारण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील सर्वाधिक खडतर आणि प्रदीर्घ अशा या रॅलीत यंदाही पूर्ण फेरी मारण्याचे उद्दिष्ट त्याने ठेवले आहे. सौदी अरेबियात ३ ते १६ जानेवारी दरम्यान डकार रॅली होणार असून, यात एकूण १३ फेऱ्या असतील. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत संजयने याबाबत माहिती दिली.

या प्रसंगी एअरपेस इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक प्रकाश गौर, पुणे ऑटोमोटीव्ह रेसिंग असोसिएशनचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे आणि श्रीकांत आपटे उपस्थित होते. डकारमधील पदार्पणानंतरच्या अनुभवांबद्दल सांगताना संजयने देशातील रॅलीप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा उल्लेख केला. तसेच, गेल्या वर्षभरातील तयारी, तंदुरुस्ती आणि रॅलीसाठी केलेल्या प्रयत्नांविषयीही तो बोलला.

संजय यंदाही ‘बगी’ गटात सहभागी होणार आहे. तो फ्रान्सच्या ‘कंपानी सहारीएन’ संघातून स्पर्धा करेल. फ्रान्सचा मॅक्झीम राऊद त्याचा नॅव्हिगेटर असेल, तर भारताचे राजय सियाल व्यवस्थापक म्हणून सोबत असतील. संजय मुंबईस्थित एअरपेस इंडस्ट्रीज संघाचे प्रतिनिधित्व करील. या कंपनीने त्याचे प्रमुख प्रायोजकत्व स्वीकारले आहे. वर्षाच्या प्रारंभी संजयने डकार रॅलीत सनसनाटी पदार्पण केले होते. डकार रॅली पूर्ण करणारा (फिनिश करणारा) तो पहिला भारतीय ठरला. त्याने ‘क्लासिक’ गटात भाग घेऊन गटात दहावा आणि एकूण ९४ स्पर्धकांमध्ये १८वा क्रमांक मिळविला. १४ दिवसांतील १२ स्टेज पूर्ण करत त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च यश नोंदविले.

तीन दशकांहून अधिक काळ रेसिंगमध्ये सक्रिय असलेल्या संजयनं देश-विदेशात ७५ पेक्षा जास्त रॅली जिंकल्या आहेत. २०१३ मध्ये त्याने आशिया पॅसिफिक रॅली मालिकेचे विजेतेपद मिळविले होते. सौदी अरेबियातील थंडी आणि वाळवंटी वातावरण या रॅलीचे विशेष वैशिष्ट्य राहते. रात्री कडाक्याची थंडी, तर दिवसा उष्ण वाळवंट — या दोन्ही परिस्थितींमध्ये स्पर्धकांना कारवर सतत नियंत्रण ठेवावे लागते. यंदा रॅलीच्या पहिल्या टप्प्यात सहा, तर दुसऱ्या टप्प्यात सात फेऱ्या होतील.

पहिल्या टप्प्यातील चौथी आणि पाचवी फेरी ‘मॅरेथॉन’ स्वरूपातील असून त्या अनुक्रमे ४५१ आणि ३५६ अशा एकूण ८७० किलोमीटर अंतराच्या असतील. अलुला ते हैल असा मार्ग असेल. चौथी फेरी विस्तीर्ण मार्गावर तर पाचवी फेरी खडकाळ आणि वळणदार रस्ता असलेली असेल. सहाव्या फेरीनंतर रियाध येथे एका दिवसाची विश्रांती असेल. दुसऱ्या टप्प्यात नववी आणि दहावी फेरी मॅरेथॉन स्वरूपाच्या राहतील. त्या वादी अद्-दाव सिअर ते विशा या मार्गांवर अनुक्रमे ४१८ आणि ३७१ असे एकूण ७८९ किलोमीटर अंतर व्यापतील. या फेऱ्या सुमारे ४८ तास चालतात. त्यात प्रत्येक स्पर्धकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची खरी कसोटी लागते.

Post a Comment

0 Comments