लातूर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देहविक्री प्रकरणात कारवाई
लातूर : स्वतःच्या फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिलेस अटक करण्यात आली असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, हरंगुळ शेतशिवार, मांजरा रेल्वे गेट परिसरात राहणारी एक महिला बाहेरून महिलांना बोलावून स्वतःच्या घरी त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत आहे.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर 14 सप्टेंबर रोजी एएचटीयु पथकाने बनावट ग्राहक पाठवून माहितीची पडताळणी केली. ती खरी ठरल्यानंतर सदर महिलेच्या घरी (हरंगुळ शेतशिवार, मांजरा रेल्वे गेट, बार्शी रोड, लातूर) छापा टाकण्यात आला. छाप्यात देहविक्रीसाठी आणलेल्या तीन पीडित महिला तसेच कुंटणखाना चालवणारी संबंधित महिला आढळून आली. सदर महिला आर्थिक फायद्यासाठी लातूर शहरातील महिलांना आपल्या घरी बोलावून घेऊन पैशाचे आमिष दाखवीत असे आणि त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असे. त्या बदल्यात ती महिलांना काही रक्कम देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकाराची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 705/2025 प्रमाणे करण्यात आली आहे. त्यात भारतीय दंड संहितेचे कलम 143 तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 मधील कलम 3, 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चवरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस कर्मचारी सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुधमाती यादव, लता गिरी, निहाल मनियार (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष) यांनी सहभाग नोंदविला.



0 Comments