Latest News

6/recent/ticker-posts

प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर वाहतूकदारांचे बेमुदत साखळी उपोषण

प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर वाहतूकदारांचे बेमुदत साखळी उपोषण


लातूर : दि. 16 - प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभाराचा व सर्वसामान्य वाहतूकदारांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत लातूर जिल्हा युवा मोटार मालक चालक संघ तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टी, लातूर यांच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात संघटनेने वारंवार निवेदने सादर केली होती. मात्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप करून हे आंदोलन छेडण्यात आले.

बेमुदत साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, 15 सप्टेंबर 2025 रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,” असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.


दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी रजेवर असल्याने आंदोलनकर्त्यांचे निवेदन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी स्वीकारले. या साखळी उपोषण आंदोलनात जितेंद्र भावे, ॲड. सैफ कोतवाल, संदीप पाटील, इनायत सय्यद, विलास लंगर, सचिन मोटे, वेदप्रकाश भुसनुरे, माधव सूर्यवंशी, अमोल शिंदे, ॲड. सचिन बोरगावकर, सोमनाथ मेदगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

Post a Comment

0 Comments