लातूरमध्ये उत्तर प्रदेशातील कानपूर प्रकरणाविरोधात निषेध मोर्चा
लातूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसामध्ये "आय लव मोहम्मद सलल्लाहू अलैही वसल्लम" असे पोस्टर लावल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल २५ मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. या कारवाईविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली असून, त्याचे पडसाद लातूरमध्येही उमटले.
सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता गंजगोलाईतील हजरत टिपू सुलतान चौक येथून मुस्लिम समाजाच्या वतीने विराट निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत नेण्यात आलेल्या या मोर्चात शहरातील विविध धार्मिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले होते. सभेत मौलाना, मौलवी व धर्मगुरूंनी उत्तर प्रदेश सरकार व पोलिस प्रशासनाचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला. मोर्चादरम्यान घोषणाबाजीचा प्रचंड गजर झाला, तर शहरातील प्रमुख मार्गांवर काही काळ वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. संपूर्ण मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.


0 Comments