दुसऱ्या राज्यस्तरीय आर्म बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा समारोप
राज्यातील १८० खेळाडूंचा सहभाग; खेळाडूंच्या जिद्दीने उजळले स्पर्धास्थळ
पुणे : पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय आर्म बॉक्सिंग चॅम्पियनशिप–२०२५ स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) उत्साहात झाला. महाराष्ट्रातील अग्रगण्य आर्म बॉक्सरांनी दमदार खेळ, जिद्द आणि क्रीडाभावनेच्या जोरावर या स्पर्धेला सुवर्णक्षणांनी सजवले. शितल (शंकर) साबळे यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली ही स्पर्धा शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मर्चंट नेव्हीचे कॅप्टन बालकृष्ण सिबिस यांनी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन इरफान मुख्तार शेख यांनी केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणातून खेळाडूंमध्ये नवचेतना निर्माण झाली. मुख्य आयोजक मंडळात प्रशांत साबळे, सागर साबळे, कार्तिक क्षीरसागर, स्वरित वडवे, सार्थक मळेकर, सोनम साबळे, जानवी साबळे, ज्ञानेश्वरी थोरात आणि आर्यन शेंडगे यांनी कार्यभार सांभाळला. उमेर अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत राज्यातील ८ नामांकित राज्यस्तरीय बॉक्सर आणि १० जिल्हास्तरीय उभरते खेळाडू यांच्यासह एकूण १८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पिंपरी, पुणे, मुंबई, अमरावती, जालना, सातारा, नाशिक आणि औरंगाबाद येथील खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. रिंगमध्ये प्रत्येक पंचसोबत जिद्द, जोश आणि विजयाची अखंड तळमळ स्पष्टपणे दिसून आली.
0 Comments