दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी "लालपरी" महागच...!
लातूर : दिवाळी सणानिमित्त राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त वाहने आणि फेऱ्या वाढविल्या असल्या तरी लालपरीचे भाडे मात्र सर्वसामान्य जनतेला न परवडणारे आहे. यामुळेच सर्वसामान्य प्रवासी खासगी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची जिव्हाळ्याची असलेली "लालपरी" आता प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. लातूर जिल्ह्यातील बहुतांश नागरिक व्यवसाय, नोकरी, उद्योग, कामधंदा, शिक्षणासाठी मुख्यत्वे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नाशिक या महानगरामध्ये वास्तव्यास आहेत. या महिन्यात दिवाळी साजरी करण्यासाठी बहुतांश नागरिक आपल्या गावाकडे येत असतात. मात्र शासनाच्या लालपरीचे भाडे पाहिले तर हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. मुंबईहून लातूर येणाऱ्या आणि परत मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांना साध्या बसमध्ये ८२५ ते ११२० रुपये, शिवशाही १२२० ते १३१९ रुपये तर शिवनेरी १८२६ ते २१७८ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. लातूर-पुणे-लातूर यासाठी साध्या बसमध्ये ५५४ ते ७५२ रुपये, शिवशाही ८१९ ते ८८५ रुपये, शिवनेरी १२२५ ते १४६१ रुपये भाडे आकारण्यात आले आहे. लातूर-छत्रपती संभाजी नगर-लातूर या मार्गासाठी साधी बस ४९३ ते ६७० रुपये, शिवशाही ७३० ते ७८९ रुपये, शिवनेरी १०९१ ते १३०२ रुपये प्रवासी भाडे आहे. लातूर- नाशिक या दरम्यान प्रवासासाठी साध्या बसमध्ये ७५५ ते १०२५ रुपये, शिवशाही १११६ ते १२०७ रुपये तर शिवनेरीसाठी १६७० ते १९९२ रुपये भाडे आकारण्यात येत आहे.
तर दुसरीकडे या लालपरीला पर्याय म्हणून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे प्रवासी दर परिवहन मंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या काळात लातूर-मुंबई दरम्यान प्रवासासाठी ७०० ते ८०० रुपये, मुंबई-लातूर १७०० ते १८०० रुपये, लातूर-पुणे ४०० ते ७०० रुपये, पुणे-लातूर १२०० ते १४०० रुपये, लातूर-छत्रपती संभाजीनगर ४०० ते ५०० रुपये तर छत्रपती संभाजीनगर -लातूर या प्रवासासाठी ८०० ते १००० रुपये भाडे घेण्यात येते. तर लातूर-नाशिक-लातूर १२०० ते १५०० रुपये भाडे खासगी बस वाहतूक करणारे घेत आहेत. एकंदरीत शासनाची लालपरी आणि खासगी प्रवासी वाहतूक बस यांच्या प्रवासी दरातील तफावत पाहता नागरिक खासगी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. दिवाळीमध्ये खासगी बस वाहतूकदार भाववाढ करतात, जास्तीचे तिकीट घेतात असा सूर आवळला जातो. यामुळे आमची बदनामी होते यासाठी लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोशिएशनने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज करून खासगी प्रवासी बसेसचे दर ठरवून आम्हाला सन्मानाने प्रवासी वाहतूक करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
सतीश तांदळे
माझं लातूर परिवार
0 Comments