पोक्सो अंतर्गत गुन्हा; लातूर शहर पोलिसांकडून दोन कॅफे चालकांना अटक
लातूर : अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी चौकशीतून गंभीर बाबी उघड झाल्यानंतर लातूर शहर पोलिसांनी दोन कॅफे चालकांना अटक केली आहे. या प्रकरणी पोक्सो कायदा, भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अल्पवयीन मुलीला फूस लावून नेण्याचा गुन्हा पोस्टे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी रिहान गुलाब शेख याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात सादर केले होते. पुढील तपासात कॅफे चालक सुरज राजेश ढगे आणि अनिकेत अजय कोटुळे यांचा सहभाग आढळून आल्याने दोघांनाही पोक्सो कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली.
तिन्ही आरोपींना न्यायालयाने ८ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याकडे सुरू आहे. घटनेशी संबंधित तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया केंद्रे यांच्यासह पथकाने केली. लातूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे. गुन्ह्याशी संबंधित माहिती लपविणे किंवा गुन्हेगारांना मदत करणे टाळावे; अन्यथा पोक्सो कायदा आणि संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.


0 Comments