आंदोलनाची दखल घेऊन जुनी पेन्शन लागू करावी पालक मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी
लातूर: दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतःअनुदानित पदावर व तुकड्यांवर नियुक्त व नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरीता आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेण्यात यावी, अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे शिक्षण संघर्ष संघटनेचे लातूर जिल्हउपाध्यक्ष देविदास कोरे सचिव प्रा. ज्ञानोबा मोरे व जिल्हा कोअर कमिटी सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 23 डिसेंबर 2021 पासून आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत:अनुदानित पद व तुकड्यांवर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरीता शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत महाविश्वास धरणे आंदोलन सुरू आहे. त्यात जुन्या पेन्शन पासून वंचित राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक, मयत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कुटुंबीय, जुन्या पेन्शन पासून वंचित असंख्य शिक्षक आंदोलनात सहभागी आहेत. सदर आंदोलनाचा आज 41 व्वा दिवस आहे परंतू सरकार त्याची दखल घेऊन हा प्रश्न गांभीर्याने सोडवत नाही. त्यामुळे जुन्या पेन्शन पासून वंचित लातूर जिल्ह्यात सुमारे नऊशे तर राज्यात साधारणतः सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासन दरबारी जुन्या पेन्शनचा प्रश्न मांडून जुनी पेन्शन योजना लागू करून सर्व अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. या प्रसंगी लातूर जिल्हा शिक्षण संघर्ष संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास कोरे, सचिव प्रा. ज्ञानोबा मोरे, एन. एच. गिरी, एन. ए. सिद्दीकी, व्ही. एच. केदार, जी. जे. सपकाळे, जी. बी. बिराजदार, वाय. ए. स्वामी, जिलानी शेख, माणिकराव नाईकवाडे, गोपीनाथ काळे, एस. व्ही. स्वामी, ए. जे. शेख, पी. जी. गंगथडे, डी. व्ही. आकडे इत्यादी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केली आहे.
0 Comments