एक वर्षापासून बेपत्ता असलेल्या मुलीला शोधण्यात लातूर पोलिसांना यश
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात AHTU ची कारवाई
लातूर: सन 2021 मध्ये पोलीस ठाणे निलंगा येथे एका अल्पवयीन मुलीचा अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 07/12/ 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस नमूद मुलीचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले व आतापर्यंत मिळून न आलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला (AHTU) आदेशित करून सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व पोलीस निरीक्षक सुभाष सूर्यवंशी हे त्यांच्या पथकामार्फत वरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अपहरण झालेल्या मुलीचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला तसेच सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून सदर मुलीचा शोध घेऊन तीच्यसोबत असलेल्या इसमासह पोलिस ठाणे निलंगा येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी पोहेका योगी, मापोना गिरी, चालक बुढे तसेच सायबर सेल यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
0 Comments