महाराष्ट्रातील सुपुत्राला युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गने दिले विशेष आमंत्रण
विनायक हेगाणा यांची शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या पिरॅमिड मॉडेलची जागतिक पातळीवर दखल
सतीश तांदळे
मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसिक आरोग्य या विषयावर संशोधन करणाऱ्या सर्वोत्तम तीन विद्यापीठांपैकी एक 'युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गने' महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या शिवार पिरॅमिड मॉडेलची दखल घेऊन जगभरातुन मानसिक आरोग्य शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांना शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या शिवार पिरॅमिड मॉडेल याविषयावर मांडणीसाठी विनायक हेगाणा या युवकाला विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
शिवारात काम करणारा कार्यकर्ता ते लेखक या भूमिकेतून विनायक यांचे शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातून संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता, शेतकरी, युवापिढी, प्रशासकीय अधिकारी यांना मार्गदर्शक ठरत आहे. शेतकरी आत्महत्या प्रश्नाचा फक्त उपापोह न करता, शाश्वत उपायातून, कृती कार्यक्रम सुचवलेला आहे. शेतकरी आत्महत्या प्रश्नाकडे बघण्याचा सर्वसमावेशकपणे दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. आतापर्यंत, जगातील १८ देशातून ३२ युवकांमध्ये जे युवक नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून सामाजिक प्रश्नांवर शाश्वत पर्यायी मार्गाने काम करतात त्यांच्या कामाचा प्रभाव हा जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने(UNDP) ठरवलेल्या १२ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SDG)अंतर्गत जागतिक पातळीवर विकासात योगदानाबद्दल ग्लोबल चेन्जमेकर फेलोशिप देवून गौरविण्यात आले आहे.
विनायक हेगाणा मागील ८ वर्षांपासून शिवार फौंडेशन माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीधर शिक्षण घेवून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात अविरतपणे काम करत आहे. शिवार संसद युवा चळवळ उभी करून शेतकरी कुटुंबातील युवकांची फौज उभी केली आहे. आत्महत्या होऊच नये यासाठी "शिवार हेल्पलाइन" या संशोधनपर संकल्पनेतून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास यश आले आहे. याची राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून विद्यापीठ स्तरावर, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स,मुंबई, आय.आय.टी मुंबई व निती आयोग भारत सरकार मार्फत ही दखल घेण्यात आली आहे. यापुढे जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शाश्वत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनासाठी तीन वर्षाच्या संशोधनातून उस्मानाबादी शेळीच्या दुधापासून साबण निर्मिती करण्यात आले आहे, हे संशोधन त्वचारोग रोखण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणून समोर येत आहे. याची जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या(UNDP) अंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SDG) विभागांमध्ये सर्वोत्तम २५ सामाजिक संशोधक 2020 साली निवड करण्यात आली होती. हा युवक मुळचा कोल्हापूरचा पण उस्मानाबाद जिल्ह्याला आपली कर्मभूमी समजून तुटपुंज्या उपलब्ध साधनांमध्ये परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे.
0 Comments