निश्चित ध्येय, जिद्द, नियोजनबध्द अभ्यासाच्या बळावर लातूरचा रोहित बनला अभियंता
लातूर : (सतीश तांदळे/उपसंपादक) परिस्थितीबद्दल कसलीही तक्रार न करता निश्चित ध्येय, इच्छाशक्ती, जिद्द, आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करीत लातूरच्या रोहित श्रीकिशन कावळे या युवकाने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळवत आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळात छत्रपती संभाजी नगर येथे तो कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू देखील झाला आहे. रोहितचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे लातूरात झालेले आहे. शालेय जीवनापासूनच त्याने अभियंता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्या अनुषंगाने बारावी नंतर कोल्हापूर येथील नामांकित केटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने विशेष प्राविण्याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
शासनाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत रोहितची जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद अशा आस्थापनावर स्थापत्य अभियंता म्हणून पहिल्या रँक मध्ये निवड झाली होती मात्र रोहितने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळात छत्रपती संभाजी नगर येथे कनिष्ठ अभियंता या पदास पसंती देऊन कार्यरत झाला आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचे रोहितचे ध्येय आहे. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकीतील उच्च पद मिळवून समाजाची सेवा करण्याचा मानस रोहितने व्यक्त केला आहे. निश्चित ध्येय, अभ्यासाचे योग्य नियोजन, जिद्द, चिकाटी, कुटुंबाची साथ या जोरावर रोहितने मिळवलेले यश उल्लेखनीय आणि या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशादर्शक असेच आहे.
0 Comments