Latest News

6/recent/ticker-posts

दिवाळीपूर्वी लातूरसाठी मोठी भेट; कव्हा क्रीडासंकुलाच्या कामाला अखेर मुहूर्तमेढ रोवली जाणार

दिवाळीपूर्वी लातूरसाठी मोठी भेट; कव्हा क्रीडासंकुलाच्या कामाला अखेर मुहूर्तमेढ रोवली जाणार


लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले कव्हा येथील विभागीय क्रीडासंकुलाचे काम अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आले आहे. यासाठीची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असून, त्यामुळे लातूरसह विभागातील खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत. लातूर तालुक्यातील कव्हा येथे विभागीय क्रीडासंकुलासाठी २२ एकर जागा पूर्वीच निश्चित करण्यात आली होती. याठिकाणी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असले तरी, संकुल उभारणीला गती मिळत नव्हती. आता तब्बल ४० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून, दिवाळीपूर्वीच या कामाचा शुभारंभ होणार आहे.

या संकुलाचा लाभ लातूरबरोबरच नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांतील खेळाडूंनाही मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने, प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंसाठी वसतिगृह तसेच इतर सोयी-सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे संकुल खेळाडूंना दिवाळीपूर्वीच मिळालेली मोठी भेट ठरणार आहे. सन २००८ साली या संकुलास मंजुरी मिळाली होती. मात्र दीर्घ काळ ते रखडले होते. संकुलासाठी मूळ ५० कोटींची मंजुरी असली तरी लातूरसाठी १२० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला मंजूर होणाऱ्या ४० कोटींच्या निधीतून प्रथम टप्प्यातील कामे हाती घेतली जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील मुख्य कामे

८ लेन सिंथेटिक धावपट्टी व नैसर्गिक फुटबॉल मैदान – १२.४५ कोटी

बहुउद्देशीय इनडोअर मैदान (कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, टेनिस, बास्केटबॉल प्रत्येकी २) – २.८९ कोटी

मुला-मुलींसाठी वसतिगृह – १८.७० कोटी

अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व मैदान विकास – ६.२० कोटी

कॅम्पस व वसतिगृहासाठी प्रकाश व्यवस्था – २.८१ कोटी

या कामाच्या गतीसाठी जिल्हाधिकारी तथा संकुल समितीच्या उपाध्यक्षा वर्षा ठाकूर-घुगे यांनी विशेष प्रयत्न केले असून, दिवाळीपूर्वीच प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कव्हा विभागीय क्रीडासंकुलाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. या संकुलामुळे लातूरसह संपूर्ण विभागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना सराव व स्पर्धेसाठी योग्य व्यासपीठ मिळेल. या उपक्रमामुळे विभागातील क्रीडा संस्कृतीला नवा आयाम मिळणार आहे.

_ प्रभारी क्रीडा उपसंचालक महादेव कसगावडे

Post a Comment

0 Comments