विभागीय शालेय बेल्ट व मास रेसलिंग क्रीडा स्पर्धा लातूर येथे उत्साहात संपन्न
लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रुरल अँड अर्बन ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर विभागस्तरीय शालेय ट्रॅडिशनल बेल्ट व मास रेसलिंग क्रीडा स्पर्धा १४ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा क्रिडा संकुल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील खेळाडू या विभागीय स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील अनेक लढती रंगतदार ठरल्या. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा 'माझं लातूर' परिवाराचे प्रमुख सतीश तांदळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी तांदळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत लातूर विभागाने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे आयोजन कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तज्ञ पंचांच्या निरीक्षणाखाली लढती यशस्वीरित्या पार पडल्या.
मास रेसलिंग आणि बेल्ट रेसलिंग या दोन प्रकारांत स्पर्धा झाल्या. सामनाधिकारी म्हणून रुरल अँड अर्बन ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष खय्युम तांबोळी, सचिव तथा राष्ट्रीय खेळाडू के. वाय. पटवेकर, नांदेड जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे सचिव व राष्ट्रीय पंच बालाजी गाडेकर यांनी जबाबदारी सांभाळली. राष्ट्रीय पंच विक्रम गायकवाड, सलोनी सुरदशे, ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पँक्रेशन असोसिएशन, धाराशिवचे सचिव राहुल अंबुरे, शुभम बोडके यांनी पंच म्हणून काम पाहिले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किरण कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार संजय स्वामी, अजमेर शेख, प्रा.जितेंद्र जाधव, उल्हास डोलारे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम बोडके, रेसलिंग कोच चेतन जावळे, शुभम बालूरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विक्रम गायकवाड यांनी केले तर आभार के. वाय. पटवेकर यांनी मानले.



0 Comments