आंतरभारतीच्या शाखांकडून मानवी विवाह संमेलनाचे आयोजन; हैदराबादमध्ये आंतरभारती दिनानिमित्त घोषणा
हैदराबाद : आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि प्रेमविवाहांना आंतरभारतीकडून ‘मानवी विवाह’ असे संबोधले जाते. या वर्षी 10 मे रोजी हैद्राबाद येथे आंतरभारती दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलताना आंतरभारतीचे राष्ट्रीय सल्लागार अमर हबीब यांनी सांगितले की, सध्याच्या काळात मानवी विवाहांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे जातीय आणि सांप्रदायिक शक्तींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्या शक्ती अशा विवाहांना विरोध करतात. अशा परिस्थितीत आपल्याला या विवाहांचे समर्थन करणारे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
अमर हबीब यांनी प्रस्ताव मांडला की, आंतरभारतीच्या प्रत्येक शाखेने मानवी विवाहितांचे संमेलन आयोजित करावे. एका ज्येष्ठ आणि एका तरुण दांपत्याचा सत्कार करावा. मानवी विवाहांच्या समर्थनार्थ व्याख्यान आयोजित करावे. अमर हबीब यांनी सांगितले की, आंतरभारतीचे माजी अध्यक्ष दिवंगत सदाविजय आर्य यांची इच्छा होती की मानवी विवाहितांचे एक राष्ट्रीय संमेलन आयोजित करावे. आपण तीन वर्षांनंतर असे संमेलन आयोजित करणार आहोत.
आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी (गोवा) यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत सांगितले की, आंतरभारती माणसामाणसांमध्ये भेद मानत नाही. त्यामुळे प्रत्येक शाखेने मानवी विवाहितांचे संमेलन आयोजित करणे आवश्यक आहे. हैदराबादच्या कल्पना आनंद यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यावर्षी आंतरभारतीच्या शाखांकडून मानवी विवाह संमेलनांचे आयोजन केले जाणार आहेत.
0 Comments