Latest News

6/recent/ticker-posts

शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण बेल्ट व मास रेसलिंग स्पर्धा उत्साहात

शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण बेल्ट व मास रेसलिंग स्पर्धा उत्साहात


निटूर : क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर व रुरल अँड अर्बन ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण बेल्ट व मास रेसलिंग क्रीडा स्पर्धा २०२५-२६ (वयोगट १९ वर्षांखालील मुलगे व मुली) ही स्पर्धा दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र विद्यालय, निटूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

स्पर्धेचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, निटूर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सोमवंशी, विक्रम गायकवाड आणि शरद कांबळे उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध भागांतून १९ वर्षांखालील ५० हून अधिक खेळाडूंनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला. उद्घाटक डॉ. श्रीनिवास मोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नियमित खेळण्यामुळे शरीर सशक्त राहतेच, परंतु आरोग्याविषयी जागरूकता आणि शिस्त या जीवनमूल्यांचेही बाळकडू खेळातून मिळते.” त्यांनी संतुलित आहार, व्यायाम आणि मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन केले.

रुरल अँड अर्बन ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन, लातूरचे सचिव के. वाय. पटवेकर यांनी स्पर्धेची प्रस्तावना करताना शासनाच्या विविध क्रीडा योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील खेळाडूंना शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत अधिकाधिक संधी उपलब्ध होत आहेत. योग्य प्रशिक्षण आणि सातत्य ठेवल्यास ग्रामीण खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्ज्वल करू शकतात.” स्पर्धेत पंच म्हणून के. वाय. पटवेकर, विक्रम गायकवाड, अर्चना राठोड, विश्वजीत येनकुरे, बालाजी राजमाने आणि शुभम घोडके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. एन. भोयबार यांनी तर आभार प्रदर्शन विक्रम गायकवाड यांनी केले. या स्पर्धेच्या यशासाठी एन. एम. पाटील यांच्या समूहाने कौतुकास्पद परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments