Latest News

6/recent/ticker-posts

केअरिंग हॅण्डस्: शून्यातून विश्वनिर्मितीचे प्रतीक - प्रा. नितीन बनुगडे

केअरिंग हॅण्डस्: शून्यातून विश्वनिर्मितीचे प्रतीक - प्रा. नितीन बनुगडे


पुणे : ( प्रतिनिधी/रोहिणी बनसोडे ) आंबी (मावळ) शून्यातून विश्वनिर्मितीचे द्योतक म्हणजे केअरिंग हॅण्डस् ही संस्था, असे प्रतिपादन शिव व्याख्याते, लेखक आणि इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बनुगडे यांनी केले. केअरिंग हॅण्डस् संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रा. बनुगडे म्हणाले, "यश मिळविण्याचे विशिष्ट तंत्र आत्मसात करा. अडचणी दिसल्यास अपयशाची भीती निर्माण होते आणि तुम्ही जिंकू शकत नाही. भीती नष्ट करा, मग यश निश्चित आहे." संस्थापक अंबादास चव्हाण यांनी यश-अपयशाचा विचार न करता कार्य सुरू केले आणि चांगल्या माणसांना जोडले, असे सांगून त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

सामाजिक स्नेहापासून वंचित बालकांना संस्कार, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दहा वर्षांत केअरिंग हॅण्डस् अहमदनगर, पुणे, मावळ, मीरा-भाईंदर भागात प्रयत्नशील आहे. मावळ हद्दीतील आंबी येथील कलाश्रम प्रकल्प परिसरात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेची कन्या श्रवणी शेलार हिने संस्थेतील अनुभव सांगून श्रोत्यांची मने जिंकली. सोहळ्यात ला. दीपक भाई शहा, शांताराम बापू कदम,सागर खैरनार, सामाजिक कार्यकर्ते गोपाळकृष्ण आय्यर, शरद कोळेकर, गोळेवाडीचे सरपंच समीर जाधव उपस्थित होते.

सोहळ्याच्या सुरुवातीला शिवशाहीर भरत साळुंके यांनी आवेशपूर्ण पोवाडे सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संस्थापक-सचिव अंबादास चव्हाण यांनी प्रस्तावनेत दहा वर्षांच्या प्रवासातील अनुभव, ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. प्रा. नितीन बनुगडे आणि ला. दीपक शाह यांचा अंबादास चव्हाण यांनी, तर विश्वस्त अरविंद तेलकर यांनी शांताराम बापू कदम, गोपाळकृष्ण आय्यर आणि सरपंच समीर जाधव यांचा सन्मान केला. मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी गायकवाड यांनी सागर खैरनार यांना आणि विश्वस्त अजय काळे यांनी शरद कोळेकर यांना सन्मानित केले.

दशकपूर्तीच्या निमित्ताने मावळ भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या. यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला. परीक्षक प्रा. संगीता झरेकर खामकर आणि श्रीकृष्ण पुरंदरे यांचाही विशेष सन्मान झाला. संस्थेचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Post a Comment

0 Comments